Friday, August 27, 2021

मानवतेचा पोशिंदा (कविता)


                            मानवतेचा पोशिंदा

 

लाख मोलाचे

आयुष्य आपुले,

कोटी जणांचे आधार.

अन्यायाविरुद्ध लढणारे सारे,

संघर्षमय जीवनसरोवर.

 

घडविले आहे आपण

जन जीवनाला ...

देवूनी सुयोग्य आकार

वाढविले आहे आपुलकीने,

दीन-दुबळ्या बहुजनांना...

करुनी विषमतेचा प्रतिकार.

 

शिकविले आहे आपण,

निरक्षरतेलाही...!

ओतुनी जीव शाहीचा निर्विकार.

मिटविले आहेत

अंधाराचे दिवे...!

पेटवूनी सप्तरंगी इंद्रधनुविष्कार.

 

संघटीत केले आहे आपण,

विखुरलेल्या शक्तीहीन शक्तीसही...!

पेरुनी बीज एकतेचे महाअपरंपार.

फुलविले आहे आपण....

रानफुलानांही...!

जिरवुनी ओसाड मातीत महाज्ञानसागर.

 

लडविले आहेत, लढे

मानव मुक्तीसाठी...

घेवूनी तळहाती शिर.

काबीज केले आहेत, गड अनेक

राष्ट्र उभारणीसाठी....

खर्चुनी पोटचे प्राणप्रिय पोर.

 

रुजविले आहेत, आपण

स्वातंत्र्य, समता....

बंधुत्व, न्यायाचे धडे

चराचरात विश्वभर

पोसीले आहे आपण,

दु:खी कष्टी

निराधार मानवतेलाच...!

अखंडपणे आयुष्यभर.


                                           -  ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे 
                                               ☎️ मो.न.8830800335 

Tuesday, October 6, 2020

कॉ. ल. शि. कोमसाहेब : एक उत्तम, यशस्वी, आदर्श प्रशासक (व्यक्तीविशेष)

 कॉ. ल. शि. कोमसाहेब :  एक उत्तम, यशस्वी, आदर्श प्रशासक.

 

    ‘पालघर’ जिल्ह्यातील आदिवासींच ‘माणुसपण’ हिरावून घेऊन त्यांना पशूवत जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या क्रूर, अन्यायकारी प्रस्थापित व्यवस्थेला उद्धस्त करून आदिवासी समाजाच्या जीवनात नवक्रांती घडवून आणण्याचे महान कार्य कॉ. शामराव परुळेकर व कॉ. गोदावरी परुळेकर या दाम्पत्यांनी केले. या नवक्रांतीच्या प्रगतीचा ‘वारसा’ नेटाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी वयाची 82 वर्ष पूर्ण झालेले चिरतरुण व्यक्तिमत्व माजी आमदार, खासदार, आदिवासी प्रगती मंडळ, तलासरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉ. ल. शि. कोम साहेब कधीही न थकता आजही अविरतपणे उत्तमरित्या पार पाडत आहेत. 

           गेल्या एका दशकापासून मी कॉ. कोम साहेबांना ओळखतो. त्यांना आजपर्यंत मी कधीही थकलेले पहिले नाही. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षातील राजकारणातल्या सक्रीय सहभागापासून ते आजपर्यंत अनेक मोठी वेग-वेगळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पक्ष संघटनात्मक पातळीवरची पदे भूषविली आहेत, तरीही आजपर्यंत मला ते कधीही तणावाखाली दिसले नाहीत. या उलट त्यांचा चेहरा नेहमी हसरा व टवटवीत दिसतो. किंबहुना त्यांच्या चेहऱ्यावर मला नेहमी एक वेगळ्या प्रकारचे तेज व उस्ताह पाहावयास मिळतो. कॉ. ल. शि. कोम साहेबांना मी स्वतः आजपर्यंत कधीही कोणावर रागावताना पाहील नाही, किंवा कोणावर रागावले असतील असे मला ऐकीवात नाही. शाळा, महाविद्यालय, पक्ष कार्यालयातील कर्मचारी असोत की सेवक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी किंवा पक्षातील सदस्य कार्यकर्ते असोत ते सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने वागतात व शांतपणे बोलतात. याचा अर्थ त्यांना कधीही कोणाचा रागच येत नाही असा होत नसून रागावर त्यांचे संपूर्ण नियंत्रण असते असा होतो. हा ‘संयम’ व ‘शांतपणा’ कॉ. ल. शि. कोम साहेबांनी त्यांना आलेल्या स्वअनुभावातून आत्मसात केलेला आहे.

        आजच्या तरुणाईलाही लाजवेल असे कॉ. कोम साहेबांच्या चेहऱ्यावरील तेज, टवटवीतपणा व व्यवस्थापण शास्त्रातील उच्च विद्याविभूषित व्यकीलाही हेवा वाटेल असा ‘संयम’, ‘शांतपणा’ ही सर्व गुणधर्म, एका उत्तम, यशस्वी, आदर्श प्रशासकाची लक्षणे मी कॉ. ल. शि. कोम साहेब यांच्यात पाहिली व अनुभवली आहेत. सत्तेची सर्व केंद्र स्वतः कडे एकवटलेली असताना कॉ. कोम साहेब यांच्या वर्तनात मला गर्व किंवा ‘मी’पणाचा किंचितही अंश कधीही पाहावयास मिळाला नाही. असे “सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व” एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात डहाणू तालुक्यातील ‘आगवन’ सारख्या लहान खेड्यात जन्मास आल असेल यावर विश्वास बसत नाही. आजच्या विविध शाखेतील मोठ-मोठ्या पदव्या संपादित केलेल्या असतानाही जीवनाची लढाई हरले असावेत असा ‘निस्तेज’, ‘निराश’ चेहरा करून बसणाऱ्या तरुणांसाठी कॉ. ल. शि. कोम साहेबांचे कार्य एखाद्या ‘दिपस्तंभासारखे’ आहे.

       कॉ. ल. शि. कोम साहेबांच्या पेहराव्यातील ‘फुल भायाचा सफारी ड्रेस’ व ‘साधी चप्पल’ हा त्यांचा नेहमीचा साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो. किंबहुना “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” ही म्हण कॉ. कोम साहेबांना तंतोतंत लागू पडते. हा राहणीमानातील साधेपणा तळागाळातील दु:खी, कष्टी, शोषित, आदिवासी बांधवाशी जवळीक साधण्याचे उत्तम साधन ठरतो. तसेच कॉ. कोम साहेबांना माणसे ओळखण्याची कला अवगत आहे. यामुळे पक्षपातळीवरील संघटनात्मक बांधणीला बळ मिळते, हे त्यानी जानले असावे. परस्थीती अनुरूप राहणीमानातील साधेपणा, स्वभावातील संयम, शांतपणा व माणसे ओळखण्याची कला इ. यातून उत्तम प्रशासकाच्या नेतृत्वाचे संघटन कौशल्य कळते. याचे प्रमाण म्हणजे गेल्या अनेक दशकांपासुन ‘तलासरी’ तालुका, सी.पी.एम.चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 

    कॉ. ल. शि. कोम साहेब यांचे विविध क्षेत्रातील कार्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील काम फार मोठे आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक या विविध क्षेत्रातील परिस्थीच्या काळोखात वैभवशाली समाजाची उषास्वप्ने पाहणाऱ्या कॉ. गोदावरी परुळेकर, कॉ. शामराव परुळेकर व कॉ. ल. शि.कोम साहेब इ. ध्येयवाद्यांनी शोषित आदिवासीच्या उत्कर्षासाठी संघर्ष आणि लढया बरोबरच त्यावर प्रदीर्घ चिंतन केले. त्यांच्या त्या जिव्हाळ्याच्या उत्कट चिंतनातून ‘आदिवासी प्रगती मंडळ’ तलासरी या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘शिक्षण’ हा कोणत्याही समाजाच्या परिवर्तनाचा पाया असतो हे कॉ. ल. शि. कोम साहेबानी जानले होते. 

‘आदिवासी प्रगती मंडळ’, तलासरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉ. ल. शि. कोम साहेब यांनी तलासरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाला ‘के. जी.’ ते ‘पी. जी.’ पर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य केले आहे. एका वसतीगृहाच्या स्थापने पासुन सुरु झालेल्या संस्थेची आज अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालय व मुला-मुलींची अनेक वसतीगृह आजच्या आदिवासी समाजातील तरुण- तरुणींना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पवित्र कार्य निरंतरपणे करीत आहेत. तलासरी व डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीचा, शैक्षणिक इतिहास जेव्हा लिहला जाईल तेव्हा कॉ. ल. शि. कोम साहेबांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख केल्या शिवाय तो पूर्ण होणार नाही.


- ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे  

☎️ मो.न.8830800335 

Monday, August 17, 2020

बंड (कविता)

    बंड

अरे माणसा....!

सोड हे लाचार जीवन,

एकवटू दे तुझे प्राण.

रोव, तुझे दोन्ही पाय, अन,

फडकव तुझ्या बंडाचे निशान,

तुझ्या प्रामाणिक, प्राणपनानं 



असु दे तुला ; तुझ्या,

अस्तित्वाची आन,

पेटव तू तुझे ज्ञान.

निखळ तेज जमेल 

चेहऱ्यावर सन्मानानं



आयुष्याच्या वाटेवर तू नको हे विसरू ,

तर्क-वितर्कानी पारखून घे ,

तू दुसऱ्याचे म्हणणे .........

असे करू नकोस , जे तुझ्या मेंदूला पटत नाही.

पटनारी गोष्टच करण्यात , जीवनाचे सार्थक आहे.

असु दे तुला ; तुझ्या,

स्वाभिमानाची जान

जागव तू , तुझ्यातील निर्भिड मन.

भयानक काळोख मग दिसेल प्रकाशमान.



लढ धाडसाने संकटाशी ,

नसतील जरी कोणीही पाठीशी .

जाऊ दे तु तुझे पाऊल पुढेच ,

घेऊ नकोस आता माघार, कर चढाई बेधुंदशाहीवर...

असु दे तुला ; तुझ्या,

                राष्ट्राचा अभिमान.

                 वाढव तू तुझ्यातील, स्वातंत्र्य समता;

                बंधुत्व , न्यायातून शांततेचे अधिष्ठान.

                निर्दोष लोकशाहीची फुलबाग फुलेल जोमानं.



              अरे, कर निषेध भ्रष्टाचार, प्रांतवाद 

                सांप्रदायवाद, जातीयवाद, वर्गभेद उचनिचतेचा,

                 स्वार्थी राजकारण अन अन्यायकारक वृत्तीचा,

                विनाशकारी शक्ती वा निरंकुश मक्तेदारीचा.

                घे,असे हाती बळ एकीचे क्रमाने ...

                लथून टाक, अराजकतेला , रक्तहीन क्रांतीने.



           

                                        - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे ;  

                                          ☎️ मो.न. 8830800335                 

ढाल - मशाल (कविता)


          ढाल - मशाल 


देहाचीच बोली,

देहाचीच वाच्या,

देहबोली चेतनांची,

खुणावते दुराचाराला.


वय नाही राघण्याचे,

नाही भय भोगण्याचे,

जीवनाच्या सरते शेवटी ;

भ्रमनिरास वाटेवरती,

लचके तोडून जाणीवांची,

लक्तरेच बनली पर्णकुटी.


चिमुकलीचे जीव,

असह्य अबलेचे घाव.

वांझपणाच ओझं,

पूर्वजन्मीचं बिज.

सुख-शांती , नैराश्य – श्रीमंती,

भांडण-तंटा , विरह – घंटा,

दुर्जन करती तयाचे भांडवल,

सज्जनांचे येथे होते कालवड.


भोळी-भाबडी मानसं,

बळी पडतात राजरोस.

शिकली-सवरली पोरंही,

अडकतात मोहजाळात सदेही.

ईश्वरइच्छा , ईश्वरआज्ञा 

याचाच होतो बोलबाला.

क्रूर-कपट कारस्थानातच,

नांदते नार अबोला.

तीच ढाल, तीच मशाल, 

पेटवते घरा-घराला.




-                                            - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे   
                                               ☎️ मो.न.8830800335           

लोकशाही शोषक (कविता)


  लोकशाही शोषक 



लोकशाही शोषक 

बनवताहेत,

शोषीत लोकशाहीस,

वातावरण पोषक.

एकाधीकारशाहीची बीजे 

पेरली जात जाताहेत...

समृद्ध समतेच्या,

भू- गोलात.


स्वातंत्र्य, ओझे वाहतो आहे.

शोषीत लोकशाहीचे...

भाई, दादा, अण्णा, बाबा,

माई, ताई, बाईचे...

शोषक वर्ग निर्माण होतो आहे.

लोककल्याणकारी सरकारात,

आज नाही राहीले एकही क्षेत्र,

लोकांचेच लोकशाहीत.


सत्ता, अधिकार, मक्तेदारीच आहे.

यांचा जीव की प्राण...

कर्तव्याशी फारकत होते आहे ;

अधिकारखुर्चीत बसून जोमानं.

अधिकाराच्या नावे...

मनमानी कारभार चालतो आहे.

दम-दाटी , प्रेमाने ...

कर्तव्याचे पुजारीच.

अर्थ लावत आहेत, कर्तव्याचा,

स्वत:च्या सोईचा क्रमाने ... 




दबावतंत्र , दडपशाही ;

हस्तक्षेप , हाणामारीने 

दुबळी बनवली जाताहे,

नोकरशाही , झुंडशाहीने.

नियंत्रीत केली जाताहेत,

अधिकार न्यायदेवतेची,

कलमे अनेक दुरुस्तीची,

साक्ष देताहेत वस्तुस्थितीची.


माध्यमे प्रसाराची ,

पांगळी झाली आहेत, आज;

राजकारणी अर्धांगवायुच्या झटक्याने,

कृष्णकृत्यास टिपणारी लेखणी.

मार्ग सोडून प्रामाणिकतेचा,

चालताहे वाटेवर जोखमी.



- ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे        

                                                ☎️  मो.न. 8830800335             

काळ (कविता)

                

काळ



कळला ना काळ, 

कुणाला ना कळली,

त्याची किमया...

काळोखाच्या गर्द छायेत,

तोच आहे, त्याचा किनारा.


तोच देतो घाव 

मनावर...

तोच बनतो,

फुंकर..

तोच आहे घात,

कुणाचा..

तोच देतो सोबत.


तोच आहे, 

जय-जयकार 

दीनाचा...

तोच आहे,

मुक्काम,

मनाचा...

 

तोच आहे, 

आक्रोश...

वेदनांचा,

तोच आहे 

जल्लोश...

भावनांचा.


तोच आहे, 

दसरा – दिवाळी,

सणाचा...

तोच आहे,

शिमगा...

अपुरेपणाचा.


काळच शिकवितो 

जगणे-मरणे

तोची शिकवितो,

मरूनही जगणे.


तोच बोलतो,

तोच चालतो.

ऐकत नाही कोणाचे.

काळापुढे चालत नाही,

काहीही मनाचे.


काळाच्या ओघात 

बदललात संदर्भ,

जगण्याचे...

संदर्भांनुसारच 

राहणे-वागणे 

असते विवेकाचे.


काळच बदलतो 

करतो अनुपालन 

निसर्ग नियमांचे 

‘परिवर्तनशिलतेचे'.  

   

 

 - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे      

                                 ☎️ मो.न.8830800335   

प्रगती पथ (प्रेरणागीत)

                                

प्रगती पथ



विकास मार्गाने, मार्गस्थ होऊ या ...

“विज्ञान संस्कृती संगती, ज्ञानदीप लावू जगती,

ज्ञान-विज्ञान, क्रांती संस्कृतीचे ब्रिद”

प्रगती पथावर आरूढ होऊ द्या .. ।।धृ।।  



विकास वाटेने प्रगती रथावर,

विज्ञाननिष्ठ विज्ञानावर ...

निसर्गराजे आरूढ होताच,

सर्व सहभागातून ...

कल्याणकारी राज्याचे अश्व 

दौडू लागतील ...

शांतता अन सुव्यवस्थेची चाके 

प्रगतीला गती देतील,

चला अशा नव निर्मितीचे 

बिजरूप होऊ या ...

ज्ञान-विज्ञान, क्रांती संस्कृतीचे ब्रिद”

प्रगती पथावर आरूढ होऊ द्या ...।।१।।  

  


मातीच्या कणा-कणांसाठी,

निसर्गातील प्रत्येक जनांसाठी,

घोडदौड सुरू होताच...

स्वार्थ अन अकार्यक्षमतेनी 

पोखरलेल्या व्यवस्था 

सर्वस्वी शरण येतील 

स्वातंत्र्य अन समतेची चाके 

प्रगतीला गती देतील 

चला अशा नव चैतन्याचे 

बिजरूप होऊ या 

ज्ञान-विज्ञान, क्रांती संस्कृतीचे ब्रिद”

प्रगती पथावर आरूढ होऊ द्या ...।।२।।    

 


मोडीत काढून भेदभावाच्या भिंती 

पेरीत जाऊ समतेला होईल क्रांती 

कलम क्रांतीची मशाल होताच 

दु:खांचे बांध फूटतील

भेदून चक्रव्युहास...

आक्रोशाचे, वादळे सुटतील 

बंधुत्व अन न्यायाची चाके 

प्रगतीला गती देतील 

चला अशा नव संघर्षाचे 

बिजरूप होऊ या ...

ज्ञान-विज्ञान, क्रांती संस्कृतीचे ब्रिद”

प्रगती पथावर आरूढ होऊ द्या ...।।३।।



अनिष्ठ रूढी-परंपरांची करू या होळी 

करू जतन अदिम संस्कृतीचे बनून माळी 

निसर्ग संस्कृतीचे जतन होताच ...

शब्द लेखणीवर स्वार होतील 

निडर अन निर्भिड वाणीने 

अन्यायावर तलवारीची धार होतील 

समृद्धी अन विविधतेची चाके 

प्रगतीला गती देतील ...

चला अशा नव संस्काराचे 

बिजरूप होऊ या ...

ज्ञान-विज्ञान, क्रांती संस्कृतीचे ब्रिद”

प्रगती पथावर आरूढ होऊ द्या ...।।४।।   



प्रज्ञा, शिल, करुनेस जीवनी अनुसरु 

सामाजिक, आर्थिक समतेस प्रस्थापित करू  

संविधानिक उद्दिष्ट प्रस्थापित होताच ,

लोकशाहीची ‘मुळे’ बळकट होतील 

समताधिष्ठित समाज रचनेची गोड फळे

नवपिढीला चाखण्यास मिळतील 

सामाजिक अन आर्थिक लोकशाहीची चाके 

प्रगतीला गती देतील 

चला अशा अखंड संविधानाशी 

एकरूप, एकजीव होऊ या ... 

ज्ञान-विज्ञान, क्रांती संस्कृतीचे ब्रिद”

प्रगती पथावर आरूढ होऊ द्या ...।।५।।   

 

विकास मार्गाने, मार्गस्थ होऊ या ...

“विज्ञान संस्कृती संगती, ज्ञानदीप लावू जगती,

ज्ञान-विज्ञान, क्रांती संस्कृतीचे ब्रिद”

प्रगती पथावर आरूढ होऊ द्या ...।।धृ।।


- ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे                       ☎️ मो.न. 8830800335